मारवड पोलीसात पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- अल्पवयीन मुलीचे नाव का घेतले याचा जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन मुलगी व आई वडिलांना लोखंडी सळईने पाच जणांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील लोण खुर्द येथे २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
लोण खुर्द येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक १४ मार्च रोजी घराच्या अंगणात गुरांना चारापाणी करण्यास गेली असता किसन देवराम पाटील यांनी मुलीला उद्देशून मनाला लज्जा वाटेल असे बोलल्याने ती घाबरून घरी निघून आली. तिने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितल्याने तिच्या वडिलांनी मी काहीतरी करतो असे बोलून तिला शांत केले. त्यानंतर १७ रोजी मुलीचे वडीलांनी किसन पाटील यांना जाब विचारला. मात्र मी तुला असा दिसतो का असे म्हणून ते निघून गेले. मात्र २१ मार्च रोजी सकाळी मुलीचे वडील चारापाणी करायला गेले असता किसन पाटील, त्यांची पत्नी शोभा पाटील हे तिथे येवून त्यांनी “मला असे कसे बोलला” म्हणून विचारणा करत त्यांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून सदर मुलगी आणि तिची आई तिथे आले. तेव्हा किसन पाटील याने मुलाला आवाज दिला व लोखंडी सळईने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच प्रवीण किसन पाटील व मधुकर देवराम पाटील, उदय मधुकर पाटील, शोभा किसन पाटील यांनी तिघांना चापट बुक्क्यांनी मारहाण करत नालीत लोटून दिले. इतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करत त्यांची सोडवणूक केली. सदर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत पोक्सोसह भादवि कलम ३२४, ५०९, ३२३, ५०४, १४३, १४६, १४७, १४९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउनि विनोद पाटील हे करीत आहेत