
सासरच्या मंडळींची जावयाला देखील मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- सुनेला नांदवण्यासाठी घ्यायला आलेल्या सासऱ्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून जावयाला देखील मारहाण केल्याची घटना २१ रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली.
आनंदा मडकू साटोटे (रा सुभाष नगर भोई गल्ली जुने धुळे) हे त्यांचा मुलगा सागर याच्यासह अमळनेर येथील रुबाजीनगर भागात त्यांचे व्याही संजय लोटन जाधव यांच्याकडे आले. सव्वा महिन्यापासून माहेरी आलेली त्यांची सून दीपाली हिला घेण्यासाठी आलो आहे तिला पाठवा असे सांगितले असता त्यांनी हे संबंध तोडायचे आहेत असे उत्तर दिले.साटोटे यांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र संजय लोटन जाधव, राहुल संजय जाधव, गोलू संजय जाधव व शोभाबाई संजय जाधव यांनी व्याही व जावयाला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. संजय जाधव यांनी आंनदा साटोटे यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून जखमी केले.त्यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




