
नागरिकांचे वेळापत्रक कोलमडले, काही भागात टँकरने पाणीपुरवठा…
अमळनेर:- झामी चौक भागातील पाण्याची टाकी पाडताना पाईप तूटल्याने शहरातील काही भागात दहा दिवस झाले तरी पाणी पुरवठा होऊ शकला नाही म्हणून टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी नदीतील जळोद येथील डोह असल्याने नगरपालिकेने पाणी पुरवठा एक दिवस उशिराने सुरू केला आहे. त्यात झामी चौक परिसरातील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने ती पाडण्यात आली. मात्र टाकी पाडताना पाईप दाबला गेल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नवीन साहित्य मागवून त्याला जोडणे आणि त्यावर काँक्रीट टाकून पक्के करणे यामुळे काही कालावधी जाणार असल्याने शहरातील वाडी चौक, झामी चौक, कुंभारटेक, भोईवाडा, रुबजी नगर, माळीवाडा, शाहआलम नगर, बालाजीपुरा आम्लेश्वर नगर,कसाली मोहल्ला आदी भागातील पाणी पुरवठा दहा दिवस लांबला. पाणी आणण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत होती. महिला, लहान मुले, वृद्ध हातात बादल्या, डोक्यावर हंडे घेऊन विहिर बोअरवेल वरून पाणी आणत होते. पालिकेने वाडी चौक, कुंभार टेक भागात अग्निशमन दलाच्या बंबानी पाणी पुरवठा केला. मात्र तोही अपूर्ण पडत होता. भोईवाडा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भागवत माळी यांच्या सहकार्याने टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच शहरातील इतर भागात देखील पाणी पुरवठा उशिराने होणार असल्याने नागरी जीवन विस्कळीत झाले आहे.
प्रतिक्रिया…
झामी चौक टाकी नव्याने बांधायची असल्याने जीर्ण टाकी पाडणे आवश्यक होते. त्यात लोखंडी पाईप दाबला गेल्याने तांत्रिक अडचण आली.नवीन साहित्य मागवून जोडणी झाली आहे. मात्र जोडणी परत उखडू नये म्हणून काँक्रीट टाकून पक्के करण्यात येत आहे. काही तासात टाकी भरण्याचे काम सुरू होईल. सकाळ पर्यंत शहरातील सर्वच भागात सुरळीत पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी सहकार्य करावे.
-तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपालिका




