मंगरूळ येथील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींचा नवोपक्रम…
अमळनेर:- माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतंर्गत मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा मिळाल्याने तालुक्यातील मंगरूळ येथील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी शालेय अभ्यासक्रमाच्या रंगवलेल्या भिंती फिकट झाल्याने पुन्हा रंगवून नवीन शैक्षणिक वर्षाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात शाळेच्या भिंती व कम्पाउंडच्या भिंतींवर गणिताची सूत्रे, इंग्रजी, मराठी, हिंदी व्याकरण, विज्ञानाची माहिती रंगवण्यात आले होते. मात्र कालांतराने त्या भिंती पुसट होऊन दिसेनासे झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन शाळा सजविण्याचे आवाहन केल्याने शाळेच्या विद्यार्थिनी प्रेरित झाल्या. त्यांनी सर्व विषयांचा महत्वाचा अभ्यासक्रम पुन्हा रंगवून त्याला उजाळा देण्याचे काम उपशिक्षक अशोक सूर्यवंशी यांच्या मदतीने हाती घेतले आहे. शाळेच्या भिंती पुन्हा आकर्षक होऊ लागल्या असून नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या उपक्रमासाठी शाळेच्या चेअरमन सुहासिनी पाटील, सचिव श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी,प्रभूदास पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे,सीमा मोरे,शीतल चव्हाण यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी कौतुक केले आहे.
इमारतीच्या खांब्यावर पाढे, भिंतींवर सुत्रे व इतर अभ्यास रेखाटण्यात आल्याने मुलांना खेळता खेळता देखील शैक्षणिक अभ्यास नजरेस पडणार आहे. त्याचा निश्चित लाभ होईल.