
शहरातील गलवाडे रस्त्यावरील साई गजानन नगरातील घटना…
अमळनेर:- शहरातील गलवाडे रस्त्यावरील साई गजानन नगर भागात पाण्याची मोटार सुरू करताना शॉक लागून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली आहे.
तालुक्यातील सबगव्हाण येथील पाटील कुटुंबीय मुलाच्या शिक्षणासाठी गलवाडे रस्त्यावरील साई गजानन नगर भागात वास्तव्यास आहे. हर्षल योगेश पाटील असे मयत बालकाचे नाव असून तो शहरातील साने गुरुजी विद्यालयात सहावीत शिकत होता. सोमवारी त्याचे आई वडील शेतात गेले होते व भाऊ पेपर देण्यास गेला असल्याने हर्षल एकटा घरी होता. दुपारी एक वाजता नळ आल्याने तो पिन जोडायला गेला असता त्याचे हात ओले असल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून तो खाली कोसळला. त्याचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला हर्षल जिन्याखाली पडलेला दिसून आला. त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात सबगव्हाण येथे अंत्यसंस्कार पार पडले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




