मारहाण करून केली लुटमार, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील खापरखेडा येथील इसमाचे चौघांनी अपहरण करून मारहाण करून घोडागाडीला बांधून ठेवले आणि लूटमार केल्याची घटना ३० रोजी रात्री घडली आहे.
संजय ओंकार रायसिंग (वय ४९) हा खापरखेडा येथील रहिवासी असून कामानिमित्त सुरत येथे राहत आहे. तो आई आजारी असल्याने गावी आला होता. ३० रोजी त्याने डोंगर सोनवणे यास फोन लावून तू माझ्या वहिनीकडे का आला होता ? अशी विचारणा केल्याने त्याचा मुलगा अमोल उर्फ मयूर याने संजयला शिवीगाळ करत तुला उचलायला येतो असे सांगून फोन कट केला. रात्री नऊ वाजेच्या सुमारास तो अंगणात झोपला असताना डोंगर सोनवणे, मयूर सोनवणे तसेच अनोळखी दोन इसमांनी येवून संजय याला व्हॅन मध्ये टाकून रस्त्यात वाहन थांबवत बेदम मारहाण केली. त्याच्या खिशातील आधार कार्ड, मतदान कार्ड व रोख २५०० रुपये काढून घेत पुन्हा गाडीत टाकून ढेकु अंबासन येथे नेवून घोडागाडीला बांधून ठेवले. त्यानंतर आपण याला पुरून टाकू ते अशी चर्चा करत असताना डोंगर सोनवणे याला कोणाचा तरी फोन आल्याने त्याने फिर्यादीस मोटरसायकलवरून मारवड पोलीस ठाण्यास सोडले. संजय रायसिंग याच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.