पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम…
अमळनेर:- येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे सुरू असलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील यूपीएससी व एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षांची अपडेट पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यूपीएससी साठी लागणाऱ्या पुस्तकांचे संच,नोट्स तसेच द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस यासारख्या महत्त्वाच्या इंग्रजी वर्तमानपत्रांची दररोज सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मराठी बारा वर्तमानपत्रे दररोज या ठिकाणी उपलब्ध असतात. क्रोनिकल, योजना,कुरुक्षेत्र, डाऊन टू अर्थ परिक्रमा, बुलेटीन,चाणक्य मंडळ मासिके दर महिन्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमपीएससी राज्यसेवा, गट ब, गट क, संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा,बँक पोस्ट रेल्वे तलाठी पोलीस भरती इत्यादी सर्व परीक्षांची पुस्तके व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे,ग्रंथालयामार्फत पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र दर रविवारी यशस्वीरित्या चालवले जाते. यात विद्यार्थ्यांना डिजिटल क्लास, तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विविध पदांवर यशस्वी झालेल्या अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन, बसण्यासाठी खुर्च्या पिण्यासाठी स्वच्छ पाणी इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात.
सन २०१६ पासून अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे एमपीएससी, युपीएससी व इतर सर्वच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून सातत्यपूर्ण पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. दर रविवारी सकाळी साडेआठ वाजेपासून या केंद्रात विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन सुरू आहे. या मोफत मार्गदर्शनामुळे अनेक तरुण विविध पदांवर यशस्वी झाले आहेत. दर रविवारी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती या ठिकाणी मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर प्रशासनातील विविध पदांवर कार्यरत असलेले अधिकारी देखील या केंद्रातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुख्य व मुलाखत अशी परिपूर्ण तयारी केंद्रामार्फत करण्यात येते. पूज्य साने गुरुजी ग्रंथालयामार्फत चालवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा लाखो रुपयाचा खर्च वाचत आहे. गरीब परिस्थितीमुळे काही विद्यार्थी मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणी युपीएससी व एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी महागड्या क्लासेसची फी भरू शकत नाहीत अशा परिवारातील विद्यार्थ्यांसाठी पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे एक संजीवनी ठरले आहे. दर रविवारी अमळनेर, पारोळा, धरणगाव इत्यादी तालुक्यातील विद्यार्थी या केंद्रात मार्गदर्शनासाठी येत असतात. पूज्य साने गुरुजी ग्रंथालयामार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सर्व सोयी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. वाचनालयाच्या कार्यालयीन वेळेत विद्यार्थ्यांनी या सुविधांचा व मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्रात आपला प्रवेश प्रत्यक्ष ग्रंथालयात येवून लवकरात लवकर निश्चित करावा, असे आव्हान पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष सचिव व संचालक मंडळ यांनी केले आहे.