
मोठ्या प्रमाणावर चाऱ्यासह शेती साहित्य जळाले, म्हशीसह मालक जखमी…
अमळनेर:- तालुक्यातील खेडी खुर्द येथे भल्या पहाट पत्र्याच्या शेडला आग लागून चारा,शेती साहित्य जळाल्याची घटना मंगळवारी घडली आहे.
अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्र जळोद येथे कैलास मधुकर पाटील व सुभाष आत्माराम पाटील यांनी पत्र्याच्या शेडमध्ये शेती साहित्य, चारा ठेवलेले होते व गुरेही बांधली होती. २ रोजी पहाटे अचानक आग लागल्याचे निंबा पाटील यांच्या निदर्शनास आले. सुभाष पाटील यांनी म्हैस सोडवण्याचा प्रयत्न केला त्यात म्हैस आणि पिल्लू आणि ते स्वतः देखील जखमी झाले. गावकऱ्यांनी बादल्यानी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळवून अमळनेर नगरपालिकेचा अग्निशमन बंब मागवण्यात आला. अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, फायरमन भिका संदानशिव यांनी आग आटोक्यात आणली. आगीत गुरांची कुट्टी, दादरचा चारा, मक्याच्या चाऱ्याच्या १ हजार पेंढ्या, नागर, वखर, कोळपणी, लाकडी दांड्या असे साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण मात्र समजु शकले नाही. आधीच दुष्काळ आणि पाणी व चारा टंचाई त्यात आगीने चारा खाक झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. कैलास पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.




