
ताब्यात घेतलेली शेती आणि घरे आई वडिलांच्या ताब्यात देण्याचे दिले आदेश…
अमळनेर:- म्हाताऱ्या आई वडिलांना त्रास देऊन आणि त्यांची घर शेती ताब्यात घेणाऱ्या मुलांनी शेती आणि घरे आई वडिलांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी दिला आहे.
तालुक्यातील निसर्डी येथील लिलाबाई गंगाराम पाटील यांनी अर्ज केला होता की, त्यांचा मुलगा चुनीलाल गंगाराम पाटील पालन पोषण करीत नसल्याने त्या उदरनिर्वाहासाठी मुलीकडे सुरत येथे राहतात. चुनीलाल याने उतारावरील बोझा कमी करण्याच्या नावाने लिलाबाई कडून शेती बक्षिस पत्र करून स्वतःच्या नावे करून घेतली होती. ते बक्षिसपत्र रद्द करण्याची मागणी केली होती. उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी ते दस्तऐवज रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
राजहोळी चौक येथील राधा जगन्नाथ काळे (वय ७४) आणि जगन्नाथ धोंडू काळे (वय ८१) यांनी अर्ज केला की मुलगा सुनील काळे हा दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करतो. आणि राहते घर नावावर करून घेतले आहे व आई वडिलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे राहण्यासाठी घराचा ताबा मिळावा अशी मागणी केली होती. मुलाच्या नावाने केलेले खरेदीखत रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. शिरूडनाका भागातील भास्कर पाटील यांनी अर्ज दिला होता की, मुलगा आणि त्याची पत्नी भांडण करून शारीरिक व मानसिक त्रास देत असतात. त्यांच्या मयत पत्नीच्या घरात ते राहतात म्हणून त्या घराचा ताबा मिळण्याची मागणी केली होती. यावर खेडकर यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर घराचा ताबा भास्कर पाटील यांना देण्याचे आदेश दिले आहेत.




