
जळगाव येथील भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेचे औदार्य…
अमळनेर:- अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथील आपदाग्रस्त कुटुंबाला जळगाव येथील भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेने घरगुती वस्तू व रोख रकमेची मदत करून दिलासा दिला आहे.
पिंपळी येथील दिलीप नामदेव पाटील यांच्या घराला २४ रोजी सायंकाळी अचानक आग लागली. सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले होते. घरातील कर्ता पुरुष दिलीप पाटील यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. आग लागताच दिलीप पाटील यांनी त्यांच्या पत्नी, मुलगा आणि नात याना वाचवण्यासाठी घराबाहेर ढकलले होते. मात्र त्यांना घराबाहेर निघता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही क्षणातच घरातील अंथरूण, पांघरूण, कपडे, रोख रक्कम, गृहोपयोगी वस्तू, किराणा दुकानातील माल, अन्न धान्य सर्व काही जळून गेले होते. आजूबाजूच्या घरांना आग लागु नये म्हणून गावकऱ्यांनी मातीचे धाबे खोदून काढल्याने घरही उध्वस्त झाले होते. या कुटुंबाला अंगावरील कपड्याव्यतिरिक्त काहीच शिल्लक नव्हते. म्हणून जळगाव येथील भारत विकास परिषदेतर्फे प्रसन्ना मांडे , उमेश पाटील, डॉ व्ही एम चौधरी, रामेश्वर भावसार, धनंजय खडके, डॉ अशोक पांडव, अरुण जोशी, चेतन दहाड, रवींद्र लठ्ठा, संतोष इंगळे, विजय मोरे, अनिरुद्ध कोटस्थाने यांनी या कुटुंबाला गाद्या, अंथरून पांघरूण,दररोज लागणारी घरगुती भांडी आणि रोख पाच हजार रुपयांची मदत दिली. यामुळे या कुटुंबाला नव्याने उभे राहण्यास दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी मनोज महाजन, मनीषा महाजन, पोलीस पाटील मीना महाजन हजर होते.




