विजय मारुती मंदिराजवळील सेंट्रल बँकेच्या एटीएममधील प्रकार…
अमळनेर:- अमळनेर शहरातील विजय मारुती मंदिराजवळील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये पैसे बाहेर येण्याच्या जागेवर काळी पट्टी लावून नंतर ते पैसे काढून घेण्याचा प्रकार ३१ मार्च रोजी दुपारी घडला.
महेशदत्त मधुकर पाटील यांनी ३१ रोजी दुपारी २:३५ वाजता विजय मारुती मंदिराजवळील एटीएम मधून २० हजार रुपये काढण्याचे प्रयत्न केला तेव्हा पैसे निघाले नाही. त्यांनतर सेंट्रल बँकेचे अधिकारी दिलीप खैरनार यांनी एटीएमचे विभागीय प्रमुख महेशकुमार सतिशराव पवार यांना कळवून प्रत्यक्ष एटीएम मशीनवर जाऊन खात्री करायला सांगितली. १ रोजी उमेश हिंमतसिंग पाटील यांनी एक हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचेही पैसे निघाले नाहीत. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांना बाहेर पांढऱ्या रंगाची कार उभी असलेली दिसली. त्यामध्ये बसलेल्या दोन जणांनी एटीएमच्या पैसे बाहेर येण्याच्या ठिकाणी काळी पट्टी लावून अडथळा निर्माण केला होता. ग्राहक येण्याची वाट पाहत बसायचे आणि ग्राहक पैश्यांची वाट पाहून थकल्याने परत गेला की आळीपाळीने पैसे काढायचे. अधिकारी बाहेर गेल्यावर दोघेही कार घेऊन पळून गेले. महेशकुमार पवार यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.