
संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,गुन्हा दाखल
अमळनेर:- अमळनेर बस स्थानकावर उभ्या असलेल्या एस टी बसमधील एका महिलेच्या बॅगेतील १ लाख पंधरा हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून दोन अज्ञात महिलांविरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीतल हितेश पाटील (वय-२३) रा.घिलगडी ता.जि.नवसारी या एका कार्यक्रमानिमित्त ३ रोजी सकाळीच नवसारी येथुन अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे येत होत्या.दुपारी १ वाजता शीतल पाटील अमळनेर बसस्थानकावरून चिमनपुरी जाण्यासाठी बसमध्ये बसायला गेल्या. गर्दी असल्याने काही महिलांनी शीतल यांना ढकलले, बसमध्ये गर्दी असल्याने त्या चालकाच्या कॅबिन मध्ये एका ठिकाणी आडोश्याला बसल्या. बस बसस्थानकातुन बस बाहेर निघण्याच्या वेळी अचानक त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या बॅगेतील ८० हजार रुपये किंमतीची दोन तोळ्याची चेन, ३२ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन,१२०० रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण,२ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज बॅगेतून चोरीला गेले आहेत. बस स्थानकाबाहेर जाणारी बस थांबवून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दोन संशयित महिलांच्या हालचालिवरून त्यांनी तो ऐवज लंपास केल्याचे लक्षात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




