
फर्निचर, खेळणी, कॅमेरा सेटअप जळून नऊ लाखांचे झाले नुकसान…
अमळनेर:- नगरपालिकेच्या शेजारी खेळण्याच्या एका दुकानाला आग लागून सुमारे ९ लाखाचे नुकसान झाल्याची घटना ४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
संदीप राजेंद्र पाटील यांचे शिवसागर गिफ्ट सेंटर या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटना कळताच आजू बाजूचे दुकानदार आग विझवण्यासाठी धावले. अग्निशमन बंब बोलावण्यात आला. अग्निशमन प्रमुख
दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख फायरमन आनंदा झिंबल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदांनशिव यांच्यासह नागरिकांनी आग विझवली. मात्र दुकानात मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आत मध्ये प्रवेश करणेही अवघड होते. दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , खेळणी, कॅमेरा सेटअप, भेट वस्तू असा सर्व एकूण ९ लाखाचा माल जळून खाक झाला आहे. हेकॉ अशोक साळुंखे यांनी पंचनामा केला.




