
तीन लाख ६७ हजारांचा ऐवज केला लंपास, गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे अज्ञात चोरट्यांनी सहा घरे फोडत तीन लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ६ रोजी पहाटे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथे ६ रोजी पहाटे चार वाजेच्या पूर्वी अज्ञात चोरट्यांच्या टोळीने सहा घरांमध्ये घरफोडी करीत रोख रक्कम, दागिने यांच्यासह किमती ऐवज लंपास केला आहे. फिर्यादी नितीन मोतीलाल पाटील यांच्या घरातील २ लाख २० हजार रुपये रोख, ५२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ८ हजार किमतीचे चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे. गं.भा. टिनाबाई ठाकूर यांच्या घरातून १० हजार रुपये रोख, महेश नामदेव ठाकूर यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख, नरेश कुलकर्णी यांच्या घरातून २५ हजार रुपये रोख, गुलाब पाटील यांच्या खोलीतून २ हजार किमतीची पाण्याची मोटार, तसेच जगदीश भटू पाटील यांच्या ही घराचा कडी कोंडा तोडून एकूण ३ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. रात्री गावातील युवराज पाटील यांचे जावई राहुल पाटील यांनी चोरांना पहिले व हटकले असता चोरांनी त्यांना मारहाण केली व पळून गेले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि शितलकुमार नाईक हे करीत आहेत.यावेळी घटनास्थळी डीवायएसपी नंदवाळकर, सपोनि शितलकुमार नाईक यांनी भेट दिली. यावेळी डॉग स्कॉड, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. डॉग स्कॉडने गावाबाहेरची दिशा दाखवली.




