अमळनेर:- एमपीडीएमधून सुटून आल्यानंतर लागलीच शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालत पोटात चाकू मारला होता. जयवंत पाटील याला गंभीर जखमा झाल्या होत्या. हल्ला केल्यानंतर शुभम देशमुख फरार झाला होता. तो अनेकदा शहरात आल्याची चर्चा होती मात्र पोलिसांच्या हातात लागत नव्हता. शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत गुन्हेगारांना अटक करण्याचे आवाहन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर याना शुभम देशमुख हा धुळे येथे मालेगाव रस्त्यावर खान्देश खानावळीत जेवण करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. नंदवाळकर यांनी तातडीने पोलीस निरीक्षक विकास देवरे याना शुभमला अटक करण्यासाठी पथक पाठवण्याचे आदेश दिले. देवरे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे,अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, निलेश मोरे, सागर साळुंखे, मधुकर पाटील यांच्या पथकाला रवाना केले. तोपर्यंत दाऊद तेथून पळून जाऊ नये म्हणून त्याला ताब्यात घेण्यासाठी नंदवाळकर यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस गौतम राजेंद्र सपकाळे,अझरुद्दीन जयरोद्दीन शेख यांना पाठवले. धुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर पोलिसांनी शुभम उर्फ दाऊदला अटक केली आहे.