दर्शनासाठी लागल्या रांगा, भजन कार्यक्रमाने आणली रंगत…
अमळनेर:-श्रीराम जयंतीनिमित्त येथील मारवड रस्त्यावरील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी उसळून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.जयंतीनिमित्त दोन दिवस भजन कार्यक्रमाने विशेष रंगत आणली.
जयंतीनिमित्त मंदीर व परिसरात फुलांनी विशेष सजावट करण्यात आली होती,सुरेख रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या,तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव पार पडला.सुरवातीला विधिवत पूजन होऊन त्यानंतर ठीक 12 वाजता रामाचा जन्म झाला,यावेळी रामनामाचा प्रचंड जयघोष करण्यात आला.यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात महिला व पुरुष भाविकांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती,हजारो भाविकांच्या साक्षीने राम जन्मोत्सव पार पडला.त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी गर्दी सुरुच होती.मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दोन दिवस भव्य दिव्य भजनाचा कार्यक्रम…
श्रीराम मंदिरात श्रीमंत प्रतापशेठ परिवारातर्फे दि. 16 व 17 एप्रिल रोज़ी भव्य दिव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 16 रोजी ओम साई लहेटी भजनी मंडळ वडचौक, अमळनेर यांचा रात्री 09 ते 12 पर्यंत भजनाचा कार्यक्रम झाला. 17 रोजी श्रीराम मंदिर अमळनेर येथील राम धून केशव-राम भजनी मंडळ यांचा सकाळी 11 ते 12 पर्यंत तर श्रीराम भजन श्री. राजीवकृष्ण महाराज (धुळेकर) यांचा सायंकाळी 05 ते 07 पर्यंत भजन कार्यक्रम पार पडला. सर्व कार्यक्रमाना भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला.
नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्यातर्फे सरबत वाटप…
उन्हातान्हात आलेल्या भाविक भक्तांना गारवा देण्यासाठी या भागाचे माजी नगरसेवक नरेंद्र विष्णू चौधरी यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे थंडगार सरबतची व्यवस्था करण्यात आली होती,हजारो भाविकांनी सरबतचा लाभ घेतला. रात्री उशिरापर्यंत सरबत चा स्टॉल सुरू होता.यासाठी नरेंद्र चौधरी व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
मंदिर पुनर्बांधणीसाठी मदतीचे आवाहन…
प्रताप फाउंडेशन संचालित श्रीमंत प्रताप शेठ यांचे श्रीराम मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी व जीर्णोद्धार साठी सढळ हाताने मदत करा असे आवाहन प्रताप फाउंडेशनच्या समिती कडून करण्यात आले असून मंदिर जिर्णोद्धारासाठी श्रीमंत प्रताप शेठ यांचे पंतु मिलिंद एम अग्रवाल हे परिश्रम घेत आहेत.मदतीसाठी 7875556589 श्री राम मंदिर, प्रताप कॉलेज समोर, मारवड रोड, अमळनेर येथे संपर्क साधावा.