
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली माहिती…
अमळनेर:- कारागृहात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असणाऱ्या आरोपीना आणि हद्दपार झालेल्या गुन्हेगारांनाही आपले सरकार अथवा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.
जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्व क्षेत्रातील वंचित राहणाऱ्या नागरिकांना मतदान करता यावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचारी, होमगार्ड याना पोस्टल बॅलेट, अथवा इडिसी मतदानाचा अधिकार देण्यासाठी माहिती मागवून कागदपत्रे पूर्तता करणे सुरू आहे. तसेच काही गुन्हेगार एमपीडीए अथवा इतर कारणास्तव कारागृहात आहेत. आणि मतदानापूर्वी ते कारागृहातून बाहेर येऊ शकत नसतील तर अशा मतदारांना निवडणूक संचालन नियम १९६७ च्या नियम १८ नुसार टपाली मतपत्रिका देण्यात येणार आहे. स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची माहिती व पत्ते मागवण्यात आले आहेत. अमळनेरातील रमण उर्फ माकू बापू नामदास ,राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ या दोन आरोपींची नावे मतदार यादीत नाहीत. तन्वीर मुख्तार शेख याला मतपत्रिका पाठवली जाणार आहे. जे आरोपी एमपीडीए मधून मुक्त झाले आहेत आणि मतदार यादीत नाव असेल तर त्यांना मतदान केंद्रावरच मतदान करता येईल. मात्र ज्या गुन्हेगारांना निवडणूक काळासाठी हद्दपार करण्यात आले आहे अशा गुन्हेगारांना पूर्व परवानगी घेऊन शहरात मतदानाला येता येईल असे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले.