
अनेक दिवसांपासून वाहनचालकांना त्रास, संबंधित विभागाचे दुर्लक्ष…
अमळनेर:- शहरातील महाराणा चौकातील चेंबर वरील लोखंडी झाकण अपघातास आमंत्रण ठरत आहे. अनेक दिवसांपासून वाहनचालकांना त्रास होत असताना देखील संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही.
महाराणा प्रताप चौकात धुळे चोपडा राज्य मार्गावर चेंबर वर असलेले लोखंडी झाकण अवजड वाहनांच्या वजनाने वाकल्याने त्याचे लोखंडी कोपरे रस्त्याच्या वर आले आहेत. रात्रीच्या वेळेस दिसत नसल्याने अनेकदा वाहनांचे चाकाला अडथळा निर्माण होऊन वाहनांचे किरकोळ अपघात झाले आहेत. तर काही वाहनांच्या टायरला लोखंडी कोपरा लागून टायर फुटले आहेत.
काही दिवसांपूर्वी देखील हे चेंबर फुटल्याने अपघात होत होते. हे चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याने अचानक लोखंडी कोपरा दिसताच वाहन वळते करावे लागते बऱ्याचदा मागची वाहने धडकण्याची शक्यता असते. यावर लावलेले लोखंडी झाकण हे अवजड वाहनांच्या तुलनेत कमकुवत असल्याने ते वाकले आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन नवीन मजबूत झाकण लावण्याची मागणी होत आहे.

