
नगरपरिषदेची छोट्या विक्रेत्यांवर कारवाई, बडे मासे मोकाट...
अमळनेर:- शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याने नगर पालिकेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अचानक धडक मोहीम राबवून चार दुकानदारांना एकूण ६५०० रुपये दंड ठोठावला. पथकाने नऊ किलो प्लास्टिक जप्त केले.
नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी शहरातील नानेश ट्रेडिंग, आर के पावभाजी व चायनीज, महेंद्र चायनीज व यश चायनीज या चार दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, पन्नी आढळून आल्याने कार्यवाही करण्यात आली. यात ज्ञानेश ट्रेंडिंग यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक साठवणूक व विक्री केल्याबद्दल पाच हजार तर आर के पावभाजी व चायनीज, यश चायनीज, महिंद्र चायनीज यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग मधून विक्री केल्याबद्दल प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी प्लॉस्टिक बंदी करत कारवाई करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, शहर समन्वयक गणेश गढरी, पथक कर्मचारी गौतम बिऱ्हाडे, योगेश पवार, महेंद्र बिऱ्हाडे, समाधान बच्छाव, युनूस शेख आदी यांनी कार्यवाही केली.
किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई, बडे व्यापारी मोकाट...
शहरात सर्रास प्लास्टिक वापर सुरू असताना नगरपरिषदेच्या पथकाने आसपास आजूबाजूला असणाऱ्या दुकानांवर कारवाई केली आहे. छोट्या विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई करत मोठ्या विक्रेत्यांना सुट दिली आहे.




