
झामी चौक भागातील घटना, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- शहरातील झामी चौक भागात लहान मुलांच्या भांडणावरून पाच जणांनी दोघांवर कोयता आणि दगड विटांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे.
२० रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फरीद शेख गुलामबी हे रात्री घरात असताना त्यांना त्यांची बहीण सायराबी शेख युनूस हिच्याशी त्यांच्या घरासमोरील नाजियाबी युसूफ पठाण ही लहान मुलांच्या खेळण्यावरून भांडण करीत असल्याचा आवाज आल्याने ते घराबाहेर पडले असता कामील अफजलखा पठाण आला आणि त्याने फरीदचे दोन्ही पाय ओढून खाली पाडले. त्याचवेळी त्याचा लहान भाऊ युसूफ उर्फ गुड्डू अफजल पठाण याने हातातील लोखंडी कोयत्याने फरीदच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. नाजीया युसूफ पठाण,रुखसाना अफजल पठाण, कामील पठाण,युसूफ पठाण यांनी विटा,दगडांनी व चापट बुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. हे भांडण सोडवण्यासाठी फरीदचे मेव्हणे सैय्यद मुस्ताक सैय्यद अब्बास हे आले असता युसूफ उर्फ गुड्डू याने त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार केला. त्यांनी तो हातावर अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. फरीदचा भाचा इम्रान शेख युनूस याने दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी धुळे येथे पुढील उपचारासाठी रवाना केले. पोलिसांनी दवाखान्यात घेतलेल्या जबाबावरून फरीदच्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध दंगल व गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.




