
एकूण २० लाखाचा मुद्देमाल जमा, एकाविरुध्द गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- मध्यप्रदेशातील इंदोर व धार दरम्यान लोखंडाने भरलेला चोरीचा ट्रक एसएसटी पथकाच्या सतर्कतेने तालुक्यातील मूडी मांडळ भागात पकडण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक व लोखंड असा एकूण २० लाखाचा मुद्देमाल जमा केला आहे.

इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान घाटाबिल्लो येथील इम्रान मोहम्मद शेर मोहम्मद याच्या घरासमोरून १० ते १२ टन लोखंडाने भरलेला आयशर ट्रक (क्रमांक एमपी ४० जीए ७७८) अज्ञात चोरट्याने २३ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरून नेला. हा ट्रक २४ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील मूडी मांडळ भागातून जात असताना निवडणूक कामासाठी लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर असलेले विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, हेकॉ भरत गायकवाड व पोकॉ दिनेश पाटील यांनी ट्रक थांबवून गाडीचे कागदपत्र मागितले. चालकाने कागदपत्र दिले मात्र पोलिसांना संशय आल्याने त्याला खाली उतरण्यास सांगितले असता तो खाली उतरत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून दाट झाडीत पळून गेला. या वाहनात अंदाजे दहा लाख किमतीचे १० ते १५ टन लोखंडी सळई मिळून आली. वाहनांची किंमत सुमारे दहा लाख रुपये असून वाहन व मुद्देमाल मारवड पोलीसात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ भरत इशी हे करीत आहेत. दरम्यान इम्रान मोहम्मद याने पेटमा (जिल्हा इंदोर) येथे ट्रक चोरीची फिर्याद दिली आहे.




