
अमळनेर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी ३८२ मतदान यंत्रे दाखल झाली असून प्रताप महाविद्यालयाच्या राणे सभागृहात सील बंद करून सुरक्षित कडक पहाऱ्यात ठेवण्यात आली आहेत.

अमळनेर विधानसभा मतदार संघात ३२४ मतदान केंद्रे आहेत. मतदान यंत्र खराब होणे अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तातडीचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून ज्यादाची मतदान यंत्रे सज्ज आहेत. प्रशासनाने सर्व यंत्रे तज्ञांमार्फत तपासून त्यांची बॅटरी क्षमता ही तपासली आहे. एकूण ३८२ बॅलेट युनिट, ३८४ कंट्रोल युनिट आणि ४१६ व्हीव्हीपॅट अमळनेर मतदार संघासाठी उपलब्ध आहेत. राणे सभागृहात सील करून सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. एक अधिकारी व चार कर्मचारी दररोज रात्रंदिवस पहारा देणार आहेत. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे या अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे.




