हतनूर ते जळोदपर्यंत कर्मचाऱ्यांच्या कडक पहाऱ्याने पाणीचोरी टळली…
अमळनेर:- शहराच्या टंचाई वर मात करण्यासाठी हतनुर धरणाचे पाणी ३० रोजी सकाळी जळोद पर्यंत पोहचणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली.
जळोद डोह आटल्याने अमळनेर शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हतनुर धरणाचे आवर्तन घेतल्या शिवाय पर्याय नव्हता. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारींच्या आदेशाने पाटबंधारे विभागाने शुक्रवार २६ रोजी दुपारी चार वाजता हतनूरचे आवर्तन सोडले. नगरपालिकेने ५० लाख रुपयात आवर्तन घेतले आहे. पाण्याची टंचाई आणि गरज पाहता रस्त्यात पाणी चोरीस जाण्याची मोठी भीती होती. काही शेतकरी बांध फोडून तर काही शेतकरी मोटारी टाकून पाणी चोरण्याची भीती होती. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी २१ कर्मचारी हतनुर ते जळोद पर्यंत नियुक्त केले होते. पाणी अडवण्यासाठी जळोद येथे आठ फूट उंचीचा बांध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी अडवण्यात येऊन टंचाईवर मात करता येईल.