
अमळनेर:- नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आलेल्या तक्रारीनुसार डुकरे मालकांकडूनच मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली.

शहरात मोकाट डुकरांमुळे नागरिकांना त्रास होत होता. शेतकऱ्यांच्या शेतातील मका फस्त करणे, नागरिकांनी वाळत टाकलेल्या अन्न धान्याची नासाडी, घरात घुसणे, घाणीत तोंड घालून नागरिकांच्या घरात प्रवेश करणे किंवा खाद्य पदार्थांना तोंड लावणे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण झाली होती. मोकाट डुकरांमुळे किरकोळ अपघात देखील होत होते. तसेच काही दिवसांपूर्वी डुकरांना ताप, सर्दी न्यूमोनिया सारखे आजार होत असल्याने गल्ली बोळात अचानक डुकरे मरण पावत होती. म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर व आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांनी डुकरे मालकांना नोटिसा देऊन त्यांना मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डुकरे मालकांनी स्वतःहून डुकरे पकडून शहराबाहेर सोडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी डूकरांपासून सुटकेचा निश्वास सोडला आहे.




