
अमळनेर:- मित्राच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी २० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

चुंचाळे येथील पिडितेच्या वडिलांचा मित्र ज्ञानेश्वर रामदास कोळी (वय ४५) याने २०२० मार्च महिन्यात तिचे आई वडील घरी नसताना घरी येऊन पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी प्रतिकार करत असताना ही बाब जर कोणाला सांगितली तर तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. पुन्हा चार दिवसांनी मुलीचे आई वडील व भाऊ शेतात गेले असताना ज्ञानेश्वर घरी आला. मुलगी टीव्ही पाहत असताना त्याने दरवाजा बंद करून पुन्हा अत्याचार केले. तीन चार महिन्यांनी मुलीचे पोट दुखू लागल्याने मुलीच्या आईने तिला डॉक्टर दीपक चौधरी यांच्याकडे नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. तेव्हा घडलेला प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी ज्ञानेश्वर विरुद्ध भादवि ३७६ (१)(अ), ३७६ (३), ५०६, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२च्या कलम ३ (अ)(४), ५ (ज)(२)६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात न्या. पी आर चौधरी यांच्या समोर चालला. सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी ११ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी चोपडा ,जळगाव व तपासणी अधिकारी संदीप आराख यांची साक्ष तसेच नाशिक येथील प्रयोगशाळा डी एन ए अहवाल ग्राह्य धरून न्या पी आर चौधरी यांनी आरोपी ज्ञानेश्वर कोळी याला कलम ३ (अ) ४ प्रमाणे २० वर्षांची शिक्षा, तसेच कलम ५(ज)२ ,६ प्रमाणे २० वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या उदरनिर्वाहाकरिता देण्याचे आदेश दिले. तसेच तिला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल तिला निर्भया फंडातून मदत मिळण्याची तजवीज ठेवली आहे. सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांना त्या आदेशाची प्रत देऊन जिल्हा विधी सेवा समितीकडे पीडितेला फंड मागणी करण्याबाबत सूचित करावे असेही आदेशात म्हटले आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेत होता. तपासणी अधिकारी संदीप आराख, पैरवी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, हेकॉ हिरालाल पाटील, नितीन कापडणे यांनी काम पाहिले.




