
गंभीरपणे सूचना देण्याचे स्टेशन अधीक्षकांचे प्रतापच्या प्राचार्यांना पत्र..
अमळनेर:- प्रताप महाविद्यालयात पायी जाणारे बरेचसे विद्यार्थी हे रेल्वे पुलाचा वापर न करता रूळ ओलांडून जात असतात हे धोकेदायक असल्याने विद्यार्थ्यांना गंभीरपणे सूचना द्याव्यात असे पत्र रेल्वे स्टेशन अधीक्षक (वाणिज्य )यांनी प्राचार्यांना दिले आहे.

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय रेल्वे रुळाच्या पलीकडे आहे. वाहनांसाठी उड्डाण पूल करण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी लोखंडी शिडी लावण्यात आली आहे. मात्र उड्डाण पुलावरून जाण्यासाठी विद्यार्थ्यांना फेऱ्यात जावे लागते आणि लोखंडी शिडी चढून उतरण्यासाठी श्रम लागतात थकवा येतो म्हणून पायी येणारे व जाणारे अनेक विद्यार्थी रेल्वे रूळ ओलांडून शॉर्ट कट महाविद्यालयात जातात. रेल्वे रूळ ओलांडणे धोक्याचे असून रेल्वे कायद्यानुसार दंडनीय आहे. बऱ्याचदा स्टेशनवर रेल्वे उभी असल्यास विद्यार्थी डब्यातून इकडून तिकडे जातात. काही विदयार्थी स्टेशनवर बसून राहतात. विद्यार्थ्यांना समजावून देखील ऐकत नसल्याने रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी याबाबत प्रतापच्या प्राचार्यांना पत्र देऊन विद्यार्थ्यांना नवीन पुलाचा वापर करण्याच्या सूचना गंभीरपणे द्याव्यात असे म्हटले आहे.




