
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे येथील सु.अ. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या ८० ते ९० झाडांना उन्हाच्या झळा बसून पाण्याअभावी ते वाळून नष्ट झाले असते. मात्र गावातील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी स्वतःच्या विहिरीवरून टँकरद्वारे झाडांना पाणी देत जीवदान दिले असून याबाबत गावात त्यांचे कौतुक होत आहे.

पिंपळे या गावाला यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने पाठविलेल्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गावातील कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयात आमची शाळा आमचा अभियान या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक अशोक देसले यांनी शाळेच्या आवारात ८० ते ९० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र मार्च महिन्यापासून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे जगविण्यात आलेली झाडे पाण्याअभावी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र गावातील लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी स्वतःच्या विहिरीवरून आठवड्यातून एक दिवस पाण्याचे टँकर भरून शाळेत असणारी टाकी भरून देवून त्याद्वारे आठवड्यातून दोन दिवस झाडांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्य लाभत आहे.




