
शासनाकडून ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर…
अमळनेर:- रब्बी हंगामाच्या ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नोंदणीचे आदेश दिले आहेत.
अनेक दिवसांपासून ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. अखेर शासनाने ८ रोजी ज्वारी खरेदीचे आदेश काढले आहेत.शासनाने ज्वारी साठी ३ हजार १८०रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे. बाजारात ज्वारी दोन हजार ते तेवीसशे रुपयाने खरेदी केली जात आहे. शेतकऱ्याला ८०० ते ११०० रुपये प्रति क्विंटल फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे.
ज्वारी खरेदीसाठी ३१ मे पर्यंत शनिवार सकाळी १० वाजेपासून नोंदणी सुरू राहील. आधार कार्ड, बँकेचा खाते क्रमांक, पीक पेरा लावलेला सात बारा उतारा यासह शेतकऱ्यांचा फोटो घ्यावा लागणार असल्याने शेतकरी स्वतः हजर राहणे आवश्यक असल्याचे शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी कळविले आहे.





