तिघांनी अमळनेर पोलिसांच्या हस्ते मूळ मालकाला केले परत…
अमळनेर:- गाडीचा काच पुसताना हातातून निसटलेले पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट तिघांनी प्रामाणिकपणे पोलिसांच्या हस्ते मूळ मालकाला परत केले.
किशोर फकिरा चौधरी (रा अंकलेश्वर, गुजरात) हे १२ रोजी दुपारी १२ वाजता मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी आले होते. पार्किंग मध्ये गाडीचा काच पुसताना त्यांच्या हातातून ५३ ग्राम सोन्याचे सुमारे साडे तीन लाख रूपये किमतीचे ब्रेसलेट हातातून पडले. ब्रेसलेट हरवल्याबाबत पोलीस निरीक्षक विकास देवरे याना कळवल्यावर त्यांनी तपासासाठी गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे या पोलिसांना पाठवले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हे ब्रेसलेट चौघांना सापडल्याचे दिसून आले. त्यांनाही ते पितळेचे वाटल्याने त्यांनी गाडीत ठेवून दिले. पोलिसांनी वाहनाचा नंबर शोधून मालकाचा शोध घेतला. त्या चौघांची नावे राहुल गजानन वाघ (रा धोदत), छगन श्रावण मिस्तरी (रा अंतुर्ली), उमेश नामदेव शेलार (रा कनाशी) नितीन राजू वाडेकर (रा भावेर) असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनाही ब्रेसलेट सोन्याचे आहे हे समजल्यावर आश्चर्य वाटले. चौघांनी आम्हीच ब्रेसलेट अमळनेर पोलीस स्टेशनला आणून देतो म्हणून सांगितले. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी मालक किशोर चौधरी याना बोलावून सुनील चौधरी यांच्या समक्ष ते ब्रेसलेट परत केले.