अमळनेर:- तालुक्यातील रुंधाटी येथील मारहाणप्रकरणी दुसऱ्या गटातर्फेही अमळनेर पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अतुल शिवाजी पवार याने फिर्याद दिली की, माझा चुलत भाऊ सागर याला गणेश भास्कर पवार मोटरसायकल थांबवून शिवीगाळ करून निघून गेला. त्यांनतर रात्री गणेश भास्कर पवार हा हातात लोखंडी रॉड घेऊन तसेच भास्कर गोविंदा पवार, संजय गोविंदा पवार, भावेश संजय पवार हातात काठ्या घेऊन आले. अतुलचा रस्ता अडवून त्याला शिवीगाळ व मारहाण करू लागले. भावेश व संजय यांनी अतुलचे हात धरून त्याला खाली पाडले आणि हातातील लाठ्यांनी कपाळावर , पाठीवर,गालावर मारहाण केली. त्याचवेळी गणेशने लोखंडी रॉडने हाताच्या कोपऱ्यावर व मनगटावर मारून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून अतुलचे काका सर्जेराव पवार भांडण सोडवायला आले असता भास्कर पवार यांनी काठीने त्यांना देखील पोटावर, छातीवर मारहाण केली. अतुल जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात व तेथून धुळे येथे हलवण्यात आले होते. हेडकॉन्स्टेबल संतोष नागरे यांनी दवाखान्यात जबाब घेतल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.