
दोन संशयितांना न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी तर इतर फरार…
अमळनेर:- शेतात जाणाऱ्या रस्त्यात मुरूम टाकण्याच्या कारणावरून आणि जुने भांडणामधून वाद निर्माण करत ४६ वर्षीय शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालपुर येथील प्रभाकर विनायक पाटील यांचा गावात राहणाऱ्या काही जणांसोबत शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होता. दरम्यान दि. १९ मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शेतातील रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर लहू पाटील, राजेंद्र लहू पाटील, दिलबर लहू पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील आणि निर्जला राजेंद्र पाटील या ८ जणांनी लाकडी दांडक्याने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले प्रभाकर पाटील यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर मारेकरी पसार झाले. याप्रकरणी प्रभाकर पाटील यांची पत्नी उज्वलाबाई पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता संशयित आरोपी ज्ञानेश्वर लहू पाटील, राजेंद्र लहू पाटील, दिलबर लहू पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र आणि निर्जला राजेंद्र पाटील यांच्या विरोधात मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी काल ज्ञानेश्वर लहू पाटील, दिलबर लहू पाटील यांना अटक केली असून त्यांना २० रोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहे.




