वरघोडा मिरवणूक उत्साहात, रत्नप्रवाह प्रवचनमालेस झाला प्रारंभ…
अमळनेर:- अध्यात्म आणि सकारात्मक जीवनशैलीचा आपल्या प्रवचनातून खुलेपणाने उपदेश करणारे सरस्वतीलब्धप्रसाद, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, जैनांचार्य, 465 पुस्तकांचे लेखक पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुन्दरसूरीश्वरजी महाराज यांचे सुमारे चाळीस संत- साध्वींसह काल दि 29 मे रोजी अमळनेर नगरीत आगमन झाल्याने श्री सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अमळनेर शहरात ज्ञानगंगेचा रत्नप्रवाह’ प्रवचन मालिकेतून दि 29 मे ते 13 जून पर्यंत ते ज्ञान देणार आहेत.काल सकाळी 6 वाजता जळगाव मार्गावरून पदयात्रेद्वारे त्यांचा नगर प्रवेश झाला त्यानंतर सराफ बाजारातील श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिरातून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली.यात सकल जैन समाजातील असंख्य महिला भगिनी व पुरुष बांधव सहभागी झाले होते.यावेळी मिरवणूक मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सदर वरघोडा वाजतगाजत श्री दादावाडी मार्गे निघून न्यू प्लॉट भागातील श्री शितलनाथ मंदिरात समारोप करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी गुरुदेवांचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
दरम्यान गुरू महाराज 29 पासून हॉटेल मिडटाऊन येथे दररोज सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान भाविकांना प्रवचन देणार असून काल पहिल्या दिवशी रत्नप्रवाह प्रवचन मालेचा शुभारंभ झाला.