तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २७ हजार २०० पुस्तके प्राप्त…
अमळनेर:- राज्य शासनातर्फे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात,शाळा 15 जूनला उघडणार असल्या तरी त्या आधीच अमळनेर तालुक्यात पाठ्यपुस्तकांची उपलब्धता झाली आहे.
१५ जूनला म्हणजेच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहे त्यादृष्टीने 1 जून पासून प्रताप हायस्कूल मधून पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळांना केले जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी दिली आहे. इयत्ता पहिली साठी 2218, इयत्ता दुसरी साठी 2536, तिसरी साठी 3207, चौथी साठी 3619, पाचवी साठी 3556, सहावी साठी 3664, सातवी साठी 4252, आठवी साठी 4148 अशी उर्दू, मराठी, सेमी इंग्रजी माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 27 हजार 200 पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळांसाठी केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेच्या प्राप्त संख्येनुसार पाठ्यपुस्तके वाटप केले जाणार आहेत. सन २०२३-२४च्या यु डायसवर विद्यार्थ्यांच्या नोंदीप्रमाणे पुस्तके प्राप्त झाली आहेत,एक जून पासून त्यांचे वाटप केले जाणार आहे. खुल्या बाजारात पाठ्यपुस्तके उपलब्ध असले तरी त्यांच्या किमती वाढल्या आहेत. शासन पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देत असल्याने पालकांचा खर्च वाचणार आहे.