कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक पाटील यांची माहिती…
अमळनेर:- बाजार समितीत धुळे, शिरपूर,शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी देखील आपला माल विक्रीसाठी आणत असल्याने तालुक्यातील मांडळ येथे उपबाजार समिती सुरू करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामसभेचा ठराव झाला आहे. तसेच मारवड उपबाजार देखील विकसित करण्यात येणार आहे.परवानगी साठी प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती सभापती अशोक पाटील यांनी दिली.
बाजार समितीची नांदेड ता धरणगाव येथे जागा आहे. पूर्वी हे गाव अमळनेर तालुक्यात होते. मात्र आता काही संबंध येत नसल्याने याठिकाणची जागा विक्री करून तालुक्यातील मारवड येथील उपबाजार विकसित करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. मारवडला गोदाम, कोल्ड स्टोरेज आदि सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. पातोंडा, मारवड, मांडळ येथे उपबाजार विकसित झाले तर बाजार समितीचे विकेंद्रीकरण होईल. तालुक्यातील शेतकऱ्यांची व बाहेर तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांची देखील सोय होईल.
अमळनेर बाजार समितीच्या नावावर १९ एकर जागा आहे मात्र उतारे फक्त २० हजार स्क्वेअर फूटचे होते. याबाबत पाठपुरावा करून सर्व उतारे अपडेट केले आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाकडून ३० वर्षांच्या नोंदी काढून बाजार समितीच्या नावावर सर्व जागा मिळवून घेतली आहे.
त्याच प्रमाणे मालाची आवक वाढली की गुरांच्या शेडकडे गुरांचा लिलाव होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे गुरांचे शेड स्थलांतरित करण्यात आले असून तेथील रिकामे शेड व्यापाऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना मालाची प्रतवारी करण्याचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे जागरूकता होऊन शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळेल. शेतकऱ्यांसाठी लवकरच एटीएम सुरू केले जाईल असेही सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.