
३१ मे रोजी १५० कर्मचारी सेवानिवृत्त, १ जूनला साजरा झाला अनेकांचा सरकारी वाढदिवस…
अमळनेर:- ३१ मे हा सार्वजनिक सेवानिवृत्त दिन ठरला तर १ जून हा सामूहिक जन्मदिवस ठरला. केकचा तुटवडा पडल्याने मंत्री अनिल पाटील यांनी पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करून वाढदिवसाला रोपे भेट देऊन पर्यावरण दिनाला ते जगवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

मे महिन्यात वाढदिवस असलेले कर्मचारी आणि १ ते ५ जून रोजी वाढदिवस असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती दिनांक ३१ मे असल्याने अमळनेर तालुक्यातून एकाच दिवशी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तर १ जून हा सामायिक, सामूहिक वाढदिवस असल्याने हे दोन दिवस सर्वसामान्य जनतेसाठी शुभेच्छांचे दिवस ठरले. विविध ठिकाणी निरोप समारंभ आणि वाढदिवस असल्याने या दोन्हीही दिवशी फुलांचे बुके आणि केकची मोठया प्रमाणात मागणी असल्याने तुटवडा जाणवत होता. अमळनेर तालुक्यातून सुमारे १५० कर्मचारी सेवानिवृत्त झाले. एकाच दुकानावर सुमारे ८०० बुकेची विक्री झाल्याचे विक्रेत्याने सांगितले.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना रोपे देऊन शुभेच्छा दिल्यात. व ही रोपे ५ जून पर्यावरण दिनी लावून ती जगवण्याचा संकल्प वाढदिवसानिमित्त करा असे आवाहन केले. यावेळी मुख्तार खाटीक,विवेक पाटील,इम्रान खाटीक, चेतन राजपूत, संजय पाटील, राहुल गोत्राळ,निलेश देशमुख, सचिन पाटील, सुनील शिंपी, आबीद अली सैय्यद, बाबा शेख हजर होते.




