यंदा १३६ कोटी खर्च, १३ वॉकवे ब्रिज बसवले,अजून चार ब्रीज बसवणार…
अमळनेर:- तालुक्याची हरित क्रांती करणारा निम्न तापी प्रकल्प पाडळसरे वर गेट ठेवण्यासाठी १३ वॉक वे ब्रिज ठेवण्यात आले असून येत्या दोन तीन दिवसात आणखी चार ब्रिज ठेवण्यात येतील. मात्र पावसाळा सुरू झाल्याने धरणाचे काम बंद करण्यात आले आहे.
निम्न तापी प्रकल्पाचे प्रस्तंभाचे काम २०२३ मध्ये दिवाळीनंतर सुरू करण्यात आले. दिवाळीपूर्वी १५ प्रस्तंभ सरासरी १४५ मीटर पर्यंत झाले होते. काम सुरू झाल्यावर १४५ ते १५१ मीटर तलांकापर्यंत झाले आहे. एकूण २३ प्रस्तंभ असून त्यापैकी २१ प्रस्तंभाचे संधानक काम झाले आहे. प्रस्तंभांची उंची सहा मीटरने वाढली आहे. नुकतीच प्रकल्पाला २८८८ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यावर्षी प्रकल्पावर १३६ कोटी खर्च झाले आहेत. आतापर्यंत प्रकल्पावर ८७४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेट ठेवण्यासाठी वॉक वे ब्रिज देखील त्यावर ठेवण्यात आले आहे. २३ वॉक वे ब्रिज ठेवण्यात येतील. आतापर्यंत १३ ब्रिज ठेवले आहेत. सालाबादाप्रमाणे जून महिना लागल्याने नदी पात्रातील बांधकाम बंद करण्यात आले आहे. ठेकेदाराने हळूहळू आपली यंत्र सामग्री बाहेर काढणे सुरू केले आहे. परंतु पावसाला असून दोन चार दिवस वेळ असल्याने तोपर्यंत आणखी चार ब्रिज ठेवण्याचे ठेकेदाराचे नियोजन आहे. पुन्हा ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल. एकीकडे भूसंपादन आणि दुसरीकडे धरणाचे बांधकाम असे काम सुरू आहे. त्या दरम्यान विविध मान्यता व तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.