वीज मंडळाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील सारबेटे खुर्द येथे एकनाथ शांताराम पाटील या शेतकऱयांच्या म्हशीला विजेचा शॉक लागून म्हैस जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
एकनाथ पाटील यांचा मुलगा निलेश हा म्हशी चारून घरी येत असताना गावाबाहेरील हौदाजवळ पाणी प्यायला म्हैस गेली असता तिला तेथे जवळच असलेल्या डीपीला ताण दिलेल्या तारेचा स्पर्श झाला. तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने म्हशीला शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. अमळनेर पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे ताण दिलेल्या तारेत प्रवाह उतरल्याने म्हशीचा मृत्यू झाला म्हणून वीज मंडळाकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.