
१६ हजार क्विंटल अपेक्षित असताना फक्त २६२२ क्विंटलच खरेदी होणार…
अमळनेर:- सुरुवातीला ज्वारी खरेदीचे आदेशच नव्हते, उशिराने नोंदणीचे आदेश आले, खरेदी साठीही आदेशाला उशीर, त्यात गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीला विलंब आणि ज्वारी खरेदीचे उद्दिष्टही कमी केले अशा प्रकारे शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालवली असल्याने अमळनेर तालुक्यात शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत.

अमळनेर तालुक्यात ज्वारीच्या शासकीय खरेदी साठी सुमारे ४३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण ८०० हेक्टर क्षेत्रातील ज्वारी खरेदीसाठी तयार आहे. शासनाच्याच धोरणानुसार प्रति हेक्टर २०.५० क्विंटल ज्वारी म्हणजे ८०० हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १६ हजार क्विंटल ज्वारी खरेदी अपेक्षित आहे. ज्वारी खरेदीसाठी ३० जुन अंतिम मुदत आहे. मात्र नुकतेच शासनाने जळगाव जिल्ह्याला २९ हजार ८९८ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकरी नोंदणीप्रमाणे उद्दिष्ट विभागून दिले आहे. अमळनेर तालुका शेतकरी संघाला पत्र पाठवून तालुक्यासाठी फक्त २ हजार ६२२ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे पहिल्या १०० शेतकऱ्यांचीच ज्वारी खरेदी होऊ शकते.
त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून इतरत्र ज्वारी खरेदीला सुरुवात झाली असून अमळनेर तालुक्याला गोदाम उपलब्ध नसल्याने सुरुवात नाही. शासनाकडे गोदाम उपलब्ध नाही आणि बाजार समितीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम उपलब्ध आहेत तर शासनाकडे त्यांचे लाखों रुपये भाडे थकबाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा चालवली आहे.
प्रतिक्रिया…
मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम बाजार समितीत आहेत. ते रिकामे असून दरवर्षी शासकीय खरेदीसाठी ते वापरले जातात. परंतु जिल्हा पुरवठा विभागाकडे सुमारे १५ लाख रुपये भाडे थकबाकी आहे. तरीही तहसीलदारांचे पत्र प्राप्त होताच शेतकऱ्यांसाठी तात्काळ गोदाम उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल.
– जी एन मगरे ,जिल्हा मार्केटिंग अधिकारी , जळगाव
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ला भाडे तत्वावर बाजार समितीतील गोदाम उपलब्ध करण्यासाठी पत्र दिले आहे.
– रुपेशकुमार सुराणा , तहसीलदार ,अमळनेर
शेतकऱ्यांना कमी भावात ज्वारी विकावी लागली , मतदानापूर्वी खरेदीचे आदेश दिले आणि मतदान संपताच उद्दिष्ट कमी केले. आता गोदाम ही उपलब्ध करून देत नाहीत. पावसाळा सुरू झाला की आर्द्रता वाढली म्हणून शेतकऱ्यांचा माल फेटाळला जाईल अशी थट्टा शासन करीत आहे. शासनाने किमान उद्दिष्ट तरी वाढवून द्यावे.
– प्रा सुभाष पाटील, शेतकरी नेते,अमळनेर




