
अमळनेर:- जिशान बेटा तू पाणी मे मत जा और जिया को भी बाहर निकाल और जल्दी घर पहुचो, हा अम्मी… व्हिडीओ कॉल वरचा हा अखेरचा संवाद, अन १५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील दोन एमबीबीएसचे विद्यार्थी रशिया येथील नोवगोरोड च्या नदीत वाहून बेपत्ता झाले. ४ रोजी रात्री भारतीय वेळेनुसार सव्वा अकरा वाजेच्या सुमारास व रशिया येथील नऊ वाजेच्या सुमारास घटना घडली. जिशान अशपाक पिंजारी (वय २०) व त्याच्या आत्याची मुलगी जिया फिरोज पिंजारी (वय २०) दोन्ही रा इस्लामपुरा अमळनेर अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.

अशपाक मुनीर पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला वेलकी नोवगोरोड शहरात रवाना केले होते. ४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जिशान, जिया आणि भडगाव येथील हर्षल संजय देसले, मुंबई येथील गुलाम गोस मलिक ही चार विद्यार्थी शहरातील वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते. नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शमीमला व्हिडीओ कॉल केला. तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते. जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता. अन जणू काही त्याच्या आईला दुर्दैवाचे संकेत प्राप्त झाले होते की काय ? लगेच शमीम यांनी जिशान याला सांगितले की, बेटा तू पाणी मे मत जा और जिया को भी बाहर निकाल ,और जलदी घर पे पहुचो. आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत त्याने लगेच व्हाट्सअप वर संदेश टाकला की आम्ही घरी जातो. अवघ्या १५ मिनिटात नदीला पूर आला अन क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहू लागले. उपस्थितांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एकीला वाचवण्यात यश आले परंतु जिशान आणि जिया यांचा थांगपत्ता लागला नाही. रात्री दोन वाजेच्या सुमारास अशपाक पिंजारी यांचे तेथील नातेवाईकांनी ही घटना कळवताच कुटुंबाला मोठा हादरा बसला. रात्री सव्वा अकरा वाजेच्या व्हिडीओ कॉल शेवटचा ठरला होता.

रशिया येथे तेथील डॉक्टर दिनेश हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तेथील यंत्रणा विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत एकाचेच प्रेत हाती लागले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना कुटुंबियांच्या घरी पाठवले. दोन्ही अधिकाऱ्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले आणि रशिया येथील सेंट पीटर बर्ग येथील दुतावासातील राजदूत डी डी दास यांचा भ्रमनध्वनी क्रमांक दिला. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रशासनाशी संपर्क करून मदतीत कोणतीही अडचण येऊ नये अशा सूचना दिल्या.राजदूत डी डी दास यांनी देखील पिंजारी कुटुंबियांना योग्य त्या मदतीचे आश्वासन देऊन संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या.
जिशान आणी जिया दोन्हीही सेंट मेरी शाळेचे विद्यार्थी होते. अशपाक पिंजारी यांनी मुलगा व भाची दोघांना शिक्षणासाठी पाठवले होते. जिशानला एक बहीण आहे तर जियाला एक भाऊ आहे. अशपाक पिंजारी हे हळदीची शेती करतात.
अशपाक पिंजारी यांनी नुकतेच दोघांना परत भारतात सुटीवर येण्यासाठी पैसे पाठवले होते. पुढील महिण्यात २३ जुलै रोजी त्यांनी विमानाची बुकिंग करून ठेवली होती. मात्र गेल्या वर्षाची त्यांची शेवटची भेट ठरली होती.




