
धो धो पाऊस पडूनही शिरूड मंडळात निरंक, शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक…
अमळनेर:- ऑनलाईन पर्जन्यमानाच्या नोंदीत त्रुटी आढळून येत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने अचूक व योग्य यंत्रणेच्या आधाराने नोंदी घ्याव्यात बाधित शेतकऱ्याना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

१८ जून रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जानवे, लोंढवे,वाघोदे, निसर्डी, खडके आदि भागात ढगफुटी सदृश्य परिस्थिती होती आणि अनेक शेतातील माती ,पिके , ठिबक नळ्या असे साहित्य वाहून गेले. महसूल विभागाच्या नोंदी आणि महावेधच्या नोंदीत खूप मोठी तफावत दिसून येत आहे. ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते. शिरूड मंडळात ८१ मिमी , पातोंडा मंडळात ६८ मिमी , मारवड मंडळात ६७ मिमी पाऊस पडला होता मात्र महावेधच्या नोंदीत शिरूड मंडळात पाऊस निरंक दाखवत आहे. तर पातोंडा १५.५ व मारवड मध्ये ३७.५ दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे निकष लागणार नाहीत. आणि शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.गेल्या दहा ते १५ दिवसात किती दिवस पाऊस पडला यांच्याही नोंदीत खूप मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे महावेधची ऑनलाईन यंत्रणा सदोष आहे. भविष्यात देखील पीक विमा, मदत, नुकसान भरपाई,ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याबाबत तांत्रिक दोषामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून जिल्हाधिकारी यांना याबाबत कळवून तांत्रिक दोष दूर करावेत अशी मागणी शेतकरी नेते किसान काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रा सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील,डॉ अनिल शिंदे, धनगर दला पाटील , दिनेश पवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे. निवेदनाची प्रत तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी याना देण्यात आली आहे.
प्रतिक्रिया…
महावेधच्या नोंदीत तांत्रिक दोष दिसून आलेत. याबाबत वरिष्ठांना कळवण्यात आले आहे. तिकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
– सी जे ठाकरे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर




