
अमळनेर:- शासनाच्या ग्रामविकास विभागाने १९ जून २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून संगणक परिचालकांची नियुक्ती महाआयटी कडून करून पुन्हा एकदा प्रकल्पात भ्रष्ट्राचार करणाऱ्या कंपन्यांना काम देण्याचा घाट शासनाने घातला असून ३००० रुपये मानधनवाढ हि १५ व्या वित्त आयोगातून केल्याने संगणकपरिचलकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाकडून झाल्याने हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी अन्यायकारक शासन निर्णयाची होळी पंचायत समिती आवारात अमळनेर ग्राम पंचायत संगणक परिचालकांकडून करण्यात आली.

मागील सुमारे १२ वर्षापासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून काम करून राज्यातील सुमारे १२ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करणार्याक ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन सामाऊन घेणे या मागणी साठी अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून लढा सुरू आहे,अनेक वेळा शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी लेखी व तोंडी आश्वासन दिले होते,दरम्यान २१ फेब्रुवारी २०२४ चे १६ मार्च २०२४ असे सुमारे २५ दिवस आझद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन केले होते. याची दखल घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३००० रुपये मानधन वाढ करण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जाहीर केला होता, परंतु ज्यावेळी १९ जून २०२४ रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला, त्यात महाराष्ट्र आय टी महामंडळाकडे आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प चालवण्याची देण्यात आल्याने संगणक परिचालकांची नियुक्ती ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून होणे हे अशक्य होणार आहे,परत संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या कंपन्यांनाच देऊन संगणक परिचालकांची कायमस्वरूपी पिळवणूक करणार असल्याने व मानधनवाढ ही राज्य शासनाच्या निधीतून न करता ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून केल्याने संगणक परिचालकांचे मानधन कधीच महिन्याचे महिन्याला होणार नसून या शासन निर्णयामुळे संगणक परिचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे,त्यामुळे ह्या अन्यायकारक शासन निर्णयाची अमळनेर ग्राम पंचायत संगणक परीचालकांकडून होळी करून आंदोलन करण्यात आले.यावेळी संगणक परिचालक संघटना अध्यक्ष अशोक पाटील,महिला तालुकाध्यक्ष राजश्री नेरकर, सचिव प्रभाकर बिरारी,श्याम पाटील, ललिता भदाणे,पल्लवी साळुंखे, नितीन भोई,रुपेश ब्राह्मणकर, महेश कापडे, प्रशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.




