
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथील कृषी विभागाने केलेल्या बंधाऱ्याच्या माती बांध वाहून गेल्याने नाल्याच्या काठावरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मुडी शिवारात भरवस रस्त्याजवळ हा नाला बांध आहे. मोठा नाल्यांपैकी हा नाला आहे. या लौकी नाल्याला १७ रोजी आलेल्या पुराने महापूर होता. यात नाल्याजवळ असलेल्या शेतात पाणी घुसले त्यात बाजरी तूर, कपाशी अशा पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान रवींद्र बारकू पाटील या शेतकऱ्याने तलाठी प्रदीप भदाणे व कृषी सहाय्यक यांनी भेट देऊन पाहणी केली. १६ रोजी नाल्याच्या उगमस्थानावर प्रचंड पाऊस झाल्याने हा नाला पाण्याने पूर्ण भरून आजूबाजूच्या शेतीत १७ रोजी रात्री पाणी घुसले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की पूरात बंधारा माती बांध वाहून गेल्याने नाल्याजवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.दरम्यान अद्याप कोणतेही पंचनामे झाले नसून पिके आडवी झाली आहेत. रवींद्र बारिकराव पाटील (बाजरी), युवराज बारीकराव पाटील (भुईमूग), डिगंबर दशरथ चौधरी (तूर), जगदीश धुडकू पाटील (कपाशी), गुलाबराव सुकलाल माळी (तूर), भाऊराव बाजीराव पाटील ( कपाशी), सर्जेराव बाजीराव पाटील (कपाशी) आदी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रतिक्रिया –
याबाबत अद्याप माहिती नाही कृषी सहाय्यकाने माहिती अहवाल दिलेला नाही. त्यांना विचारून माहिती घेतो.चंद्रकांत ठाकरे, कृषी अधिकारी
प्रतिक्रिया –
मी स्वतः त्या दिवशी रात्री जाऊन आलो. आणि नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करायला लावले आहेत.- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार
प्रतिक्रिया…
मी फोन केला तेव्हा फक्त तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी येवून फक्त फोटो काढले. मात्र पंचनामे करतो वगैरे काही सांगितले नाही. – युवराज पाटील, शेतकरी मुडी




