सकल सुतार समाजातर्फे मूक निषेध आंदोलन
अमळनेर:- तालुक्यातील बोदर्डे येथील बेकायदा सावकारी अत्याचारामुळे गळफास घेणारे सुतार कारागीर मयत संतोष मिस्तरी याला न्याय मिळावा यासाठी येथे ४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी १२ वाजता सकल सुतार समाजातर्फे मूक निषेध आंदोलन करण्यात आले.
सुतार समाजाचे ओबीसी नेते बाळासाहेब पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्याचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनात मयत संतोष हिरामण मिस्तरी रा. बोदर्डे याने २१ रोजी सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची गृहखात्यामार्फत सखोल तपास करून सावकारी प्रतिबंधक कायदा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हे नोंद करावे व आरोपींचा जमीन रद्द करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व कठोर शिक्षा व्हावी. तसेच आत्महत्याग्रस्त निराधार, दुर्बल कुटुंबास तात्काळ शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी. सदर प्रकरणात तात्काळ कार्यवाहीचे आदेश देऊन पिडीतास व महाराष्ट्रातील सुतार समाजास न्याय द्यावा. अशी मागणी केली आहे. तसेच मंत्री अनिल यांना देखील निवेदन देण्यात आले असून त्यांनीही पोलिसांना सूचना दिल्या असून शासकीय मदत देण्याबाबत आश्वासन सुतार समाजाच्या नागरिकांना दिले आहे.