अमळनेर:- धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील सीमेवरून पांझरा नदी वाहते. अलीकडे तालुक्यातील गावे नदीकाठी आहेत. त्यामुळेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याची आवक वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग व सहाय्यक अभियंता श्रेणी-१, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा यांच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत विसर्ग ३५०० क्यूसेक पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी पांझरा नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.