शेतकरी संवाद व विद्यार्थी संवाद मेळाव्यासह महायुती समेट बैठकही होणार
नियोजन बैठकीत मंत्री अनिल पाटलांनी केले मार्गदर्शन
अमळनेर-१२ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार अमळनेर दौऱ्यावर येत असून या दौऱ्याची तयारी आपण आतापासूनच सुरु केली आहे, ना.पवारांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा व विद्यार्थी, युवा संवाद मेळावा होणार असून कार्यकर्त्यांची महायुती समेट बैठकही होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नियोजन बैठकीत मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणालेत की अजित पवारांनी पहिल्या टप्प्यात मोठा सभा न घेता विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी व संवाद साधण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे नियोजन केले आहे.12 रोजी सुरवातीला दुपारी 3 वाजता प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात विद्यार्थी व युवा संवाद मेळावा होणार आहे, या ठिकाणी प्रत्येक गावातून व शहरातून विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक व युवती यांना निमंत्रित केले जाणार आहे. प्रत्येकासाठी येथे पुरेशी आसन व्यवस्था असणार आहे. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता महायुतीच्या कार्यकर्त्यांची समेट बैठक होऊन 15 ते 20 मिनिटे ते सर्वांशी थेट संवाद साधतील. यानंतर कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी संवाद मेळावा होणार असून याठिकाणी सर्व समाजाच्या शेतकरी बांधवाना सन्मानाने निमंत्रित केले जाईल. या तिन्ही कार्यक्रमांची जय्यत तयारी आपल्याला करावयाची असून प्रत्येकाने मिळेल ती जवाबदारी काळजीने निभावून तिन्ही मेळावे यशस्वी करावेत असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
निवडणुकीचे रणशिंगही फुंकले,,,
सदर बैठकीच्या निमित्ताने मंत्री अनिल पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग देखील फुंकून आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, आपली भूमिका व वाटचाल प्रखरपणे न डगमगता मांडा, सोशल मीडियावर जास्तीत जास्त सक्रिय व्हा, विकास कामांमुळे आपल्याकडे मांडण्यासारखे मुद्दे भरपूर आहेत, आता उत्तराला उत्तर हीच आपली भूमिका असेल, कुणी विरोधक बनावट पत्र देऊन आपल्या कामाचे श्रेय घेत असतील तर त्यांना सडेतोड उत्तर द्या, राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणला असून यात अमळनेर मतदारसंघ आघाडीवरच आहे, सर्वांनी आप आपल्या गावात केलेल्या विकास कामाचा फलक लावा जेणेकरून गावातील लोकांना कळेल की आपली कामे काय ? आज रोजी आपल्या मतदारसंघात बदल निश्चितपणे झालेलाच आहे त्याचं मार्केटिंग करण्याची आणि लोकांना पटवून देण्याची जबाबदारी आता तुमची आहे, मला मुंबईत व दिल्लीत जो मान सन्मान मिळाला जे भाग्य लाभलं त्याचे खरे श्रेय कार्यकर्ते म्हणून तुम्हालाच असुन याहीपुढे जे जे चांगले घडेल त्याचेही श्रेयकरी तुम्हीच असाल असेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगत उपस्थित कार्यकर्त्याचा उत्साह वाढविला.
प्रास्तविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष विनोद कदम यांनी केले. सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा पदाधिकारी, अमळनेर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व फ्रन्टलचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधीं उपस्थित होते.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024