असंख्य महिला,पुरुष व तरुण मंडळी सहभागी,वर्णेश्वर महादेव मंदिरावर जलाभिषेक
अमळनेर-श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी कावड यात्रा काढण्यात आली,यावर्षी कावड यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळून हजारो महिला, पुरुष आणि तरुण देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
संस्थान चे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून बारा वर्षांपूर्वी कावड यात्रेस सुरुवात झाली आहे, शिवभक्तांच्या कावड यात्रेस यंदाच्या वर्षी खऱ्या अर्थाने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.सकाळी सर्व शिवभक्त श्री वर्णेश्वर महादेव मंदिरातून वाहनाने जळोद येथे पोहोचल्यावर बुधगाव च्या बाजूस तापी नदीत उतरले तेथे विधीवत पूजा केली व नंतर कावडीतील पात्रात जल घेऊन पायीच वर्णेश्वरकडे निघाले.
हजारो शिवभक्त वाजंत्री च्या तालावर नाचत गाजत व महादेवाचा जयघोष करीत शिस्तीने रस्त्याच्या कडेने चालत होते.
रस्त्यावर अनेक ठिकाणी शिवभक्तानी नाश्ताची व चहा पाण्याची व्यवस्था केली होती.प्रामुख्याने अमळगाव येथे कॉन्ट्रॅक्टर श्रीराम चौधरी यांनी सर्व भक्तांना साबुदाणा खिचडी व केळी चा महाप्रसाद दिला शहरातील व तालुक्यातील तसेच बाहेरगावहून देखील शेकडो शिवभक्त शिवभक्तांच्या भेटीसाठी आले होते,काहींनी पाणी बिस्कीट वगैरे सोबत आणून वाटप केले.शिवभक्तांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात तर वाटेत माजी आमदार शिरीष चौधरी,डॉ अनिल शिंदे,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील,निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात.
या कावड यात्रेत सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थान साने नगर, श्रीराम मंदिर संस्थान नंदगाव,हरेश्वर महादेव मंदिर रडावंन राजोरे,पुष्कर महादेव मंदिर व निरंजन महादेव मंदिर गांधली महादेव मंदिर टाकरखेडा नागेश्वर महादेव मंदिर जळोद ओंकारेश्वर महादेव मंदिर फरशीरोड अमळनेर,ओंकारेश्वर महादेव मंदिर व जुने महादेव मंदिर अमळगाव,महादेव मंदिर टाकरखेडा, नीलकंठेश्वर महादेव मंदिर सुंदरपट्टी, इत्यादी गावातून शिवभक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते,सायंकाळी 5 पर्यंत सर्व शिवभक्त वर्णेश्वर महादेव मंदिरावर पोहोचल्यावर महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला.यासाठी महादेव मंदिर ट्रस्ट च्या पदाधिकारीनी परिश्रम घेतले.