
अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर आगारातर्फे ९ ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिवस व कामगार पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे १५ जुलै पासून प्रवाशांच्या तक्रारी तसेच सूचना यांच्या स्थानिक पातळीवर जलदगतीने निवारण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भगवान जगनोर यांनी प्रवाशांच्या समस्या व तक्रारी,तसेच सूचना ऐकून घेतल्या. समस्या सोडविण्याच्या दृष्टीने जगनोर यांनी आगार प्रमुखांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवाशी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.यावेळी रा.प.कामगारांच्या अडचणी देखील ऐकून घेण्यात आल्या.
यावेळी कामगार कल्याण अधिकारी कमलेश भावसार,आगारप्रमुख प्रमोद चौधरी,वाहतूक निरीक्षक चंदू चौधरी,अनिकेत न्हाळदे,तुषार साळुंखे,विजय वाडेकर तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

