पाहणी करून अद्याप भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप…
अमळनेर:- जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अमळनेर तालुक्यातील आठ ही मंडळात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पाहणी करून ही अद्याप भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप होत आहे.
दरम्यान २५ टक्के अग्रिम भरपाई साठी पात्र असून ही अद्याप भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नुकसानीमुळे बळीराजा हवालदील झालेला आहे. अस्मानी संकटासह सुलतानी संकटांचा देखिल शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतकरी व बागायतदार शेतकरी कापूस, मका, सोयाबीन ,बाजरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया झाली आहे. विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष स्पॉट येऊन पिकांची पाहणी करून देखील सुद्धा विमा कंपन्यांनी भरपाई दिली नाही. तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व शासन स्तरावर मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करावा अशी पिंपळे परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.