
अमळनेर:- भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनीच सुमारे ११ लाखात फसवणूक केल्याची घटना ११ ऑगस्ट २०२३ ते ५ एप्रिल २०२४ दरम्यान घडली.
भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड बँकेचे मॅनेजर अमोल सुरेश मराठे (रा शिवपार्वती कॉलनी छत्रपती चौक मूळ रा वेल्हाणे धुळे) यांनी फिर्याद दिली की बँकेचे कर्मचारी उमाकांत आधार विसावे (रा झुरखेडा ता धरणगाव) व मयूर मिठाराम बडगुजर (रा सुंदरगढी ता चोपडा) हे दीड वर्षापासून कलेक्शन करत होते. विसावे यांनी १२२ सदस्यांकडून ८ लाख ९७ हजार ७७४ रुपये व बडगुजर याने २२ सदस्यांकडून २ लाख १५ हजार ७६३ असे एकूण ११ लाख १३ हजार ५१० रुपये गोळा करून बँकेच्या रोखपालकडे भरला नाही. तसेच त्यांना वारंवार संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. बँकेचे फोन उचलणे देखील बंद केले. त्यामुळे या दोघांनी बँकेची फसवणूक केल्याची खात्री झाली म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.




