
अमळनेर : तालुक्यात वावडे येथे मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी योजनेला सुरुवात झाली असून वावडे परिसरातील सुमारे १२०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. शेतकऱयांच्या अडचणी दूर होऊन शेतीत प्रगती करता येणार आहे.
विजेचा भार वाढल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना दिवस वीज मिळत नाही म्हणून त्यांना रात्री उठून शेतात जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासदायक व्हायचे अपूर्ण झोपेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी योजना अंमलात आणली आहे. ग्रामीण भागात गायरान जमिनीवर सौर पॅनल उभारून त्यातून निर्माण झालेली वीज दिवसा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील वावडे येथे शासनाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्फत १६ एकर गायरान जमीन वीज वितरण कंपनीच्या नावावर करून त्याठिकाणी सौर पॅनल लावण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता आणि प्रभारी विभागीय कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी नुकतीच याठिकाणी भेट दिली असून २५ ते ३० टक्के काम झाले आहे. येत्या एक ते दीड महिन्यात काम पूर्ण होऊन सौर ऊर्जेवर ४ मेगा वॅट वीज निर्मिती होईल आणि तो वावडे विजकेंद्राला दिली जाईल. तेथून वावडे ,मांडळ , जवखेडा या गावांच्या शिवारातील सुमारे १२०० शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हेलपाटे वाचून त्रासातून मुक्तता होणार आहे.




